Friday, August 20, 2010

मी आणि परेड

ह्या शीर्षकात मी आधी आणि परेड नंतर असे लिहिलेले आहे कारण आपण सामान्य माणस. आपल्या साठी महत्वाचे आपण स्वतःच असतो व इतर गोष्टी नंतर येतात पण त्यातल्याच काही गोष्टी अशा असतात ज्या नसत्या तर आपण कुठे असतो ह्याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. 

माझ्यासाठी परेड ही अशीच एक गोष्ट आहे म्हणून आज पर्यंत परेडने मला जे काही दिले ते सगळे तुम्हाला सांगायचे आहे. हे मांडायचे कारण एकच- आपण आपल्या तर्क कुतर्कांमुळे देवाने दिलेल्या बर्याच गोष्टी/ संधी गमावत असतो. पण कधी कधी आपल्याच मित्रांच्या अनुभवातून आपण नवीन गोष्टी शिकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परेड मला जे आज पर्यंत देत आली आहे त्याची भरपाई करणे तर शक्य नाही पण ही परेड माझ्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहचावी हीच इच्छा व त्यासाठी ही लेखमाला.    

ह्या लेखमालेतून आपल्या समोर माझे परेड मधले अनुभव, सुरुवात, आता पर्यंतचा माझा आणि परेड प्रोजेक्टचा प्रवास मला पुन्हा एकदा माझ्या वाचक मित्रांबरोबर करायचा आहे. सुरुवात अर्थातच स्वतः पासून आणि मग हळू हळू परेड प्रोजेक्ट पर्यंत असा लेखमालेचा मार्चपास आपण करणार आहोत. पण आधीच सॉरी हं कारण परेड मध्ये आधी तेज चल आणि मग धीरे चल शिकवले जाते आणि इथे मात्र आपले अनुभवांचे मार्चपास धीरे चल पासून तेज चल पर्यंत जाणार आहे. 

तर माझ्यासाठी परेडची सुरुवात झाली आत्मबल विकास वर्ग २००३ इथपासून. 

आश्चर्य वाटले? विषय परेड आणि सुरुवात आत्मबल वर्ग २००३??
 
त्याचे झाले ते असे...

आत्मबल वर्गात प्रवेशासाठी आधी फॉर्म भरून घेतले जातात. मी देखील नंदाई स्वतः क्लास घेते हे ऐकून आपण ही हा क्लास करायचा ह्या विचाराने फॉर्म  भरण्यासाठी जून २००३ मध्ये हैप्पी होमला पोहचले. तिथे फॉर्म मध्ये एक प्रश्न होता की संस्थेतील कुठल्या उपक्रमामध्ये भाग घ्यायला आवडेल. मी लिहिले AADM आणि अहिल्या संघ कारण १३ कालमी योजना सुरु झाली होती आणि हे दोन विषय माझ्या जास्त आवडीचे होते. पण माझी आत्मबल मध्ये काही निवड झाली नाही. तेव्हा बापू आणि आई स्वतः आत्मबल साठी निवड करतात असे कळले होते. त्यामुळे बापू आईने माझी त्या वर्षी निवड का केली नाही ह्या विचाराने खूप वाईट वाटले कारण पुढे करिअर मध्ये कसा वेळ मिळेल ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण माझी निवड तर बापू आईनी करून झाली होती. त्यांनी मला खरच AADM आणि अहिल्या संघासाठी निवडले होते. लेकरासाठी काय आणि कधी द्यायचे हे बापू आणि आईला नेहमीच माहित असतेच. फक्त आपल्याला ते कळत नसते. मी हिरमुसले आणि बापूनी पुन्हा लीला केली. त्याच वर्षी जुलै महिन्यात उपासना केंद्रात ज्यांना परेड जॉईन करायची आहे अशा DMVs ची नावे मागितली गेली. मला खूपच आनंद झाला. मी लगेच नाव दिले. त्या वर्षी १५ ऑगस्टला केंद्रातून झेंडा वंदन केले. मार्चपास नव्हते पण AADM युनीफोर्ममध्ये सल्युत दिला.   

अश प्रकारे माझी परेडची सुरुवात जुलै २००३ मध्ये झाली आणि मी दर रविवारी सकाळी लवकर उठून नियमित प्रक्टीसला जायला लागले. ही अक्षरे ठळक करण्याचे पण कारण आहे. परेडची आवड लहानपणापासूंची. कॉलेज मधून NCC मध्ये भाग घ्यायची इच्छा होतीच. पण माझा आळस आणि कॉलेज मध्ये सायन्स घेतल्याचे निम्मित्त, ह्या मुळे तेव्हा NCC काही जॉईन केली नाही. पण रुखरुख मात्र कायम होती की आळसामुळे मी मोठी संधी गमावली आणि ते प्रकर्षाने जास्तच जाणवले जेव्हा सायन्समध्ये मन रमेना म्हणून बारावी नंतर तेरावीला डायरेक्ट कॉमर्सला अडमिशन घेतली. तेव्हा वेळ भरपूर मिळाला पण NCC ची संधी आणि वेळ गेली होती. ह्या संधी बरोबरच अजून एक मोठी संधी मी पुढे गमावणार होते ज्याची मला कल्पना ही नव्हती. ती कुठली ते पुढे येणारच आहे. 

तर अशी माझी परेड प्रक्टिस सुरु झाली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला घरून जराही विरोध कोणीही केला नाही. माझी आई स्वतः कॉलेज मध्ये असताना परेड मध्ये भाग घ्यायची म्हणून तिच्यासाठी तर ही अभिमानाची गोष्ट होती. ऑक्टोबर २००३ पर्यंत सगळे नीट चालू होते आणि एक दिवस अचानक AADM मधून पुन्हा निरोप आला की ज्यांना अनिरुद्ध पौर्णिमेला परेड मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी रविवारी सकाळी ७ वाजता विख्रोळी येथील विकास हायस्कूल मध्ये जमावे.... 

आणि तिथे जे काही पुढे झाले ते पुढील भागात...