Tuesday, September 28, 2010

पुढच्या वर्षी लवकर या...

गणपती बाप्पा आले म्हणता म्हणता बुधवारी आपल्या घरी गेले सुद्धा. जितक्या प्रेमाने आपण बाप्पाला घेऊन येतो तितक्याच जोशात त्याला परत त्याच्या घरी पाठवतो जेणे करून तो पुढच्या वर्षी तितक्याच उत्साहाने, आनंदाने परत येईल. पण इथेच गडबड होते. 'जोश मे होश खो देना' हेच बहुतेक वेळा बघण्यात येते. धांगडधिंगा पेक्षा गदारोळ आणि हैदोस जास्त जाणवतो. त्यातच खिसेकापूपासून मवाल्यानपर्यंत सगळ्यांचीच चंगळ होते. बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या आयाबायांना त्रास देणे, दारू पिऊन गदारोळ करणे ह्या गोष्टी पण घडतात. तरुणाईचा हा बेधुंद पणा बघून जेव्हा देशाच्या भविष्याची काळजी वाटायला लागते तेव्हा पिवळ्या टोपीतून आशेचा किरण डोकावू लागतो. काय म्हणता पिवळी टोपी नाही माहित? अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या गणवेशाचा अविभाज्य भाग. पुरुषांसाठी काळी विजार आणि सफेद शर्ट व स्त्रियांसाठी काळी सलवार  सफेद कुर्ता व काळी ओढणी आणि डोक्यावर पिवळी टोपी. गणेश मुर्ती विसर्जनच्या वेळी हे कार्यकर्ते पोलिसांना गर्दी नियंत्रण तसेच ट्राफिक कंट्रोल साठी मदत करतात. एकीकडे हुल्लडबाजी करणारा जमाव किवा नुसतेच बघे, तसेच एका बाजूला गर्दी मध्ये अडकणारे साधेसुधे भाविक, अशा लाखो लोकांमध्ये हे शिस्तप्रिय कार्यकर्ते अधिकच उठून दिसतात. ह्यातील तरुण कार्यकर्त्यांची संख्या तर लक्षणीय आहे. हे सर्व कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्धतेने आपले काम चोख पार पाडत असतात. पोलिसांना पण त्यांचा आधार हवासा असतो. आपल्या सद्गुरूच्या प्रेमाखातर आणि सामाजिक भान सांभाळत हे कार्यकर्ते आपल्या सेवे मध्ये तल्लीन झालेले असतात. मग पाउस येवो अथवा कडक ऊन पडो, त्याची फिकीर त्यांना नसते. आपल्या सद्गुरूचा शब्द त्यांच्या साठी सर्वकाही असतो. कुठल्याही प्रकारचे मानधनच काय पण साधा इतरांकडून चहा- नाश्ता सुद्धा स्वीकारत नाहीत. त्यांच्यासाठी खाण्याची, जेवणाची सोय सुद्धा संस्थेतर्फेच केली जाते. सद्गुरू बापूंना अभिप्रेत असलेली निष्काम भक्तिमय सेवा करणे हेच प्रमाण मानतात. हे DMVS  अशा सामाजिकच नव्हे तर सर्व प्रकारच्या आपत्तींना सामोरे जाण्यास तत्पर आहेत. ह्या सगळ्याची गरज काय? हे तर पोलीस आणि सैन्याचे काम आहे, अशीच आपली सर्वांची धारणा असते. पण येणाऱ्या काळातील तिसरे महायुद्ध फक्त सीमेवर नाही तर घराघरातून लढले जाणार आहे ह्याची झलक आपल्याला नजीकच्या घडामोडींमधून कळत आहेतच. अशा वेळी आपण सीमेवर लढणाऱ्या जवानांवर भार न बनता, स्वतःच कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम असणे किती गरजेचे आहे ह्याची जाणीव रोजच वर्तमान पत्र उघडलं की लक्षात येते. डॉ अनिरुद्ध जोशींनी (अनिरुद्ध बापूंनी) लिहिलेल्या 'तिसरे महायुद्ध' ह्या पुस्तकात लिहिलेल्या कित्येक गोष्टी आज घडताना आपण पाहतो. त्यांचा द्रष्टेपणा व पुढील काळाची गरज ओळखूनच डॉ अनिरुद्ध जोशींनी अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना केली आहे ती स्वतः केलेल्या अभ्यासातून आणि कष्टातून. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हेच ह्या ऍकेडमीचे ब्रीदवाक्य आहे. आणि सद्गुरू कृपेनेच ते पूर्णत्वास जाणार हे निश्चित.

Thursday, September 16, 2010

गणपती बाप्पा मोरया !!

गणपती बाप्पा मोरया !! म्हणता म्हणता गणपती बाप्पा आले आणि २ आणि ५ दिवसांचे गणपती आपल्या घरी परत ही गेले. सगळ्या सणांपेक्षा ह्या सणाचे हेच वेगळेपण आहे. हल्ली नात्यांमध्ये वाढत जाणारा दुरावा आणि स्वतःच्याच आप्तांचे न उमगणार्या भावना ह्यांची वाढत जाणारी संख्या अशा वेळी गणेशोत्सव जास्तच महत्वाचा ठरतो. आजही हा सण खूप उत्साहाने आणि मनापासून साजरा केला जातो.  इतर नात्यांमध्ये आलेला दुरावा सुद्धा कितींदा नाहीसा होतो. मनातले दुरावे बाजूला सारून सगळी मंडळी एकत्र येतात आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी.

बाप्पा ला घरी आणताना आपल्याच घरातल्या लाडक्या लेकीचा त्याहून लाडका लेक येतो म्हटल्यावर जे आनंदाचे उधाण येते सर्वाना ते खरच मनाला मोहवून टाकत. गणपती, बाप्पा कमी आणि सोनुल्याच जास्त वाटतो. त्याचे ते निरागस आणि लोभसवाण रुपडं बघूनच दैनंदिन कटकटी कुठच्या कुठे पळून जातात. त्याचे किती लाड करावे आणि नको असे होऊन जाते. त्याच्या गालावरून आणि सोंडेवरून मायेने हाथ फिरवण्यात जी आपुलकी जाणवते ती त्याला देव म्हणून लांबून नमस्कार करताना नाही जाणवत. लेकाच्या पाठोपाठ २ दिवसांनंतर येते त्याची आई गौरी. घरची लेक एका वर्षानंतर माहेरी येणार म्हटल्यावर तर घरातल्या सगळ्या आई आज्यांना तिचे किती कोडकौतुक करू असे होऊन जाते. आपण जरी तिला घरची लेक म्हणून प्रेम करत असलो तरी ती जगन्माता पार्वती आपल्या भक्तांच्या/ लेकरांच्या प्रेमाखातर स्वतःच त्यांची लेक बनून येते आणि त्यांच्या प्रेमाने तृप्त होऊन परत आपल्या लेका सोबत आपल्या घरी जाते. इतर देवांना आपण देवघरात बसवून दूर लोटले पण ह्या दोन देवताच अशा एकमेव आहेत ज्या अजून ही फक्त देवघरात नव्हे तर आपल्याच बरोबर आपल्यातलेच बनून राहतात. त्यांचे हे आचरण आपल्यासाठी आदर्श असायला हवे. भक्त कितीही श्रीमंत असो वा गरीब प्रत्येक घरात तितक्याच मनापासून बाप्पावर प्रेम केले जाते.

आणि मग जेव्हा बाप्पाची त्याच्या घरी परत जायची वेळ येते तेव्हा तो दिवस उगवूच नये असेच वाटत राहते. तरी ही आपले मनातले दुख बाजूला सारून त्याने परत लवकर यावे म्हणून त्याला वाजत गाजत 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत निरोप दिला जातो. पण ह्या उत्सवाला गालबोट लागते ते इथेच. आपण प्रेमाने आणलेल्या बाप्पाच्या मुर्ती रुपाला आपण बेदरकारपणे किनार्यावर सोडून देतो. जी मूर्ती आपण देव म्हणून पुजली तिलाच आपण हवी तशी पाण्यात झोकून देतो. प्लास्टर ऑफ प्यारीस POP पासून बनलेली ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळत तर नाहीच उलट पाणीसुद्धा दुषित करते आणि पाण्यातील वनस्पतींना/ जीवांना सुद्धा अतिशय धोकादायक असते. कुठल्या देवाला आवडेल आपल्या नावाने आपल्याच इतर बाळांना धोका उत्पन्न झालेला? ह्यावर उपाय तरी काय? गणपती बाप्पाला घरी आणू नये? शक्यच नाही. हा उपाय नाही पळवाट झाली. ह्यावर अतिशय सोप्पा उपाय म्हणजे इको फ्रेंडली गणपती बाप्पा. म्हणजे नक्की काय? हा इको फ्रेंडली बाप्पा म्हणजे कागदाच्या लगद्या पासून बनवली जाणारी बाप्पाची मूर्ती. कागदाचा लगदा, डिंक आणि खाद्य रंगापासून बनवली जाणारी ही मूर्ती अजिबात प्रदूषण करत नाही. उलट पाण्यात लगेच विरघळते आणि माशांसाठीसुद्धा हा लगदा खाद्य बनतो. वजनाला खूप हलकी आणि सौंदर्य आणि फिनिशिंग पण अगदी POP नी बनवलेल्या मुर्तीसारखेच. तसेच सध्या वापरल्या जाणार्या पद्धतीनुसार ह्या मूर्ती तब्बल ११ फूट उंच बनवता येतात. त्यामुळेच इको फ्रेंडली गणपतींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पण अजून ही सामान्य लोकांच्या मनामध्ये माहितीच्या अभावी आणि पूर्वापार चालत आलेली POP च घट्ट आहे. पण लवकरच हे चित्र नक्कीच बदलेल अशी चिन्ह आहेत. कारण ह्या वर्षी श्री अनिरुद्ध उपासना फौंडेशनने तब्बल ६००० इको फ्रेंडली गणपती मूर्तींचे वाटप केले. अतिशय सोप्प्या पद्धतीने बनणाऱ्या ह्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या मूर्तींमध्ये कागद वापरला जातो तो रामनाम लिहिलेल्या वह्यांचा. त्यामुळे ह्या मूर्त्यांमध्ये पवित्र स्पंदन पण वाढलेली असतात. तसेच कार्यकर्ते आपले घरदार, नोकरी-व्यवसाय सांभाळून कुठलेही मानधन न घेता दिवस रात्र एक करून ह्या मूर्ती बनवतात. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या समधानाची तर गोष्टच वेगळी. इको फ्रेंडली गणपती मुळे प्रदूषणाचा एक प्रश्न तर सुटला. पण जो पर्यंत POP च्या मूर्ती बनणे पूर्णपणे थांबत नाही तो पर्यंत विसर्जनानंतर किनार्यावर येणाऱ्या भग्न अवशेषांचे आणि पसरणाऱ्या प्रदूषणाचे काय? त्या साठी सुद्धा अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जनाच्या दुसर्या दिवशी सर्व प्रमुख समुद्र किनार्यांवर गणेश मूर्ती पुनर्विसार्जनाची सेवा करतात. गौरी गणपती मूर्ती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी हे कार्यकर्ते किनार्यावर येणाऱ्या मूर्त्यांना खोल पाण्यात सोडून येतात जेणे करून किनार्यावर त्या येणार नाहीत आणि पाण्यात विरघळायला वेळही मिळेल. तसेच किनार्यावरील निर्माल्याचा झालेला कचरा सुद्धा काढून समुद्र किनारा स्वच्छ करतात. अशा प्रकारे हा गणेशोत्सव आपण साजरा केल्यास आपल्या बाप्पाला नक्कीच जास्त आनंद होईल नाही का? आणि तो आणखीन मनापसून आनंदाने पुढल्या वर्षी  येईल.